मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन प्रामुख्याने विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठी वाढीव अनुदान मिळावं या मागणीसाठी आहे. दोन दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शिक्षकांकडून देण्यात आल्यानंतर या आंदोलनात आता मंत्री गिरीश महाजन यांनीही हजेरी लावली आहे. विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांच्या खात्यात 20 टक्के वाढीव पगार जमा होईल, असं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलं. यामुळे आझाद मैदानावरील शिक्षकांच्या आंदोलनाला यश आल्याचे पाहायला मिळत आहे. पुढे ते असेही म्हणाले की, ‘आता तुमच्या पगाराचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. तुमच्या शिक्षकांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हे ठरलं की दोन-तीन दिवसात सर्व तांत्रिक बाजू समजावून घेऊन, येत्या 18 तारखेला अधिवेशन संपल्यावर तुमच्या खात्यात पैसे आलेले असतील. यात कोणताही बदल होणार नाही.’
