Devendra Fadnavis : कर्नाक उड्डाणपुलाचे नाव आता ‘सिंदूर उड्डाणपूल’, मुख्यमंत्र्यांनी केले उद्घाटन
दक्षिण मुंबईतील नूतनीकरण केलेल्या कर्नाक उड्डाणपुलाचे नाव आता ‘सिंदूर उड्डाणपूल’ असे ठेवण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या नावात बदल केला असून, हे नाव भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या पाकिस्तानविरुद्धच्या लष्करी कारवाईपासून प्रेरित आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या पुलाचे उद्घाटन आज फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाचा उल्लेख करत काळ्या इतिहासाच्या पानांचा संदर्भ दिला.
हा पूल दक्षिण मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडतो. यापूर्वी हा पूल कर्नाक पूल म्हणून ओळखला जात होता, ज्याचे नाव 1839-1841 दरम्यान मुंबई प्रांताचे राज्यपाल जेम्स रिव्हेट कर्नाक यांच्यावरून ठेवण्यात आले होते. आता ‘ऑपरेशन सिंदूर’च्या स्मरणार्थ या पुलाला ‘सिंदूर पूल’ असे नाव देण्यात आले आहे.
