Tue. Jan 27th, 2026

महापालिका निकाल जाहीर; कोणत्या महापालिकेत महापौरपदासाठी रस्सीखेच?

मुंबई | 20 जानेवारी 2026

राज्यातील २९ महापालिकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर सत्तास्थापनेचा खरा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. बहुतांश महापालिकांमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना स्पष्ट किंवा काठावरचे बहुमत मिळाले असले, तरी महापौरपदावरून महायुतीतीलच पक्षांमध्ये तीव्र रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये महापौरपदाचे गणित अद्याप अनिश्चित असून २२ जानेवारी रोजी होणारी आरक्षण सोडत निर्णायक ठरणार आहे.

मुंबईत महापौरपदावर भाजप–शिवसेना (शिंदे) संघर्ष:

देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबईत भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. ठाकरे बंधूंच्या युतीला ७१ जागांवर रोखण्यात भाजपला यश आले. महापौर महायुतीचाच होणार हे स्पष्ट असले, तरी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात अडीच-अडीच वर्षांसाठी महापौरपदाच्या वाटपावरून मतभेद असल्याची चर्चा आहे.

भाजपकडे सर्वाधिक जागा असल्या तरी बहुमतासाठी शिंदे गटाच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे) कडून अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी होत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत तणाव:

ठाणे महापालिकेत शिवसेना (शिंदे) ने ७५ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले असले, तरी भाजपनेही अडीच वर्षांसाठी महापौरपदाचा दावा केल्याने तणाव निर्माण झाला आहे. आमदार निरंजन डावखरे यांनी सत्तेत सन्मानजनक वाटा न मिळाल्यास विरोधात बसण्याचा इशारा दिल्याचे समजते.

कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटाला ५२ आणि भाजपला ५१ जागा मिळाल्या असून बहुमताचा आकडा ६२ आहे. ठाकरे गट आणि मनसेचे नगरसेवक येथे किंगमेकर ठरू शकतात. दोन्ही प्रमुख पक्षांकडून सत्ता स्थापनेसाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे संकेत आहेत.

उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये स्पष्ट चित्र:

उल्हासनगरमध्ये शिवसेना (शिंदे) ने वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांचा पाठिंबा मिळवत संख्याबळ ४० वर नेले असून भाजपला (३८ जागा) मोठा धक्का बसला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि सोलापूरमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. पुण्यात भाजपने ११९, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ८४ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

कोल्हापूर, सांगली आणि अहिल्यानगरमध्ये अनिश्चितता:

कोल्हापूरमध्ये महायुतीला बहुमत असले तरी भाजप (२६) आणि शिवसेना (शिंदे – १५) यांच्यात महापौरपदावरून मतभेद आहेत. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे) युतीचे संकेत दिल्याने सत्तासमीकरण बदलण्याची शक्यता आहे. सांगलीत भाजपला ३९ जागा मिळाल्या असून बहुमतासाठी एका जागेची आवश्यकता आहे. शिंदे गटाचे दोन नगरसेवक येथे निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. अहिल्यानगरमध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने २७ आणि भाजपने २५ जागा जिंकल्या आहेत. दोन्ही पक्ष महापौरपदावर दावा करत असून सत्तावाटपावरून चर्चा सुरू आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात संमिश्र चित्र:

नागपुरात भाजपने १०२ जागांसह निर्विवाद सत्ता मिळवली आहे. अकोला आणि अमरावतीमध्ये मात्र बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अपक्ष आणि छोट्या पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेस २७ जागांसह मोठा पक्ष ठरला असून भाजपला २३ जागा मिळाल्या आहेत. ठाकरे गटाचे नगरसेवक येथे किंगमेकरच्या भूमिकेत आहेत.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून लातूरमध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे. परभणीत शिवसेना (उद्धव ठाकरे गट) सर्वाधिक जागा जिंकून आली असून काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेची शक्यता आहे.

22 जानेवारीची आरक्षण सोडत निर्णायक:

22 जानेवारी 2026 रोजी सर्व २९ महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव राहते, यावर अनेक शहरांतील सत्तास्थापनेचे अंतिम गणित ठरणार आहे. २५ जानेवारीनंतर महापौर निवडीच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *