Tue. Jan 27th, 2026

अमोल बालवडकरांची उमेदवारी नाकारण्यामागे पक्षनिष्ठेची चाचणी की राजकीय बेईमानी?

पुणे | 5 जानेवारी

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 (बाणेर–पाषाण–सूस) मधील उमेदवारीवरून अमोल बालवडकर आणि भाजप यांच्यातील वाद सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. भाजपकडून उमेदवारी नाकारल्यानंतर बालवडकरांनी शेवटच्या क्षणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयामागे पक्षाने केलेला अन्याय आहे की पक्षनिष्ठेची परीक्षा नापास झाल्याची ही किंमत आहे? यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

भाजप हा कार्यकर्त्यांना संधी देणारा आणि संयमाला महत्त्व देणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. संघटनात्मक शिस्त, दीर्घकालीन काम आणि पक्षनिष्ठा यांच्या आधारे नेतृत्व घडवण्याची परंपरा भाजपमध्ये असल्याचे पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते सातत्याने सांगतात. पुणे शहरातूनच प्रकाश जावडेकर, मुरलीधर मोहोळ, विजय काळे, जगदीश मुळीक आणि योगेश टिळेकर यांसारखी उदाहरणे दिली जातात.

अमोल बालवडकर यांना महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी भाजपवर निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय केल्याचा आरोप केला. मात्र, भाजपच्या अंतर्गत वर्तुळात हा निर्णय बालवडकरांच्या पक्षनिष्ठेची चाचणी असल्याचे सांगितले जाते.

मिळालेल्या माहितीनुसार, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या सुमारे तासभर आधी वरिष्ठ नेत्यांनी बालवडकरांना तिकीट नाकारल्याची माहिती दिली. राजकीय निरीक्षकांच्या मते, पक्षाला त्यांचे पर्याय पूर्णपणे बंद करायचे असते तर ही माहिती शेवटच्या क्षणापर्यंत दिली नसती. त्यामुळे ही परिस्थिती बालवडकरांची राजकीय चाचणी होती, असं सांगण्यात येतंय.

भाजपमध्ये यापूर्वीही अनेक वरिष्ठ नेत्यांची तिकिटे कापण्यात आली आहेत. 2014 मध्ये राज्यसभा निवडणुकीत प्रकाश जावडेकर यांचे तिकीट कापण्यात आले होते. 2019 मध्ये चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली. मात्र, या सर्वांनी पक्षाचा निर्णय स्वीकारत पुढील जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि नंतर पक्षाने त्यांना महत्त्वाची पदे दिली. याशिवाय, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्या जागी गिरीश बापट यांना तिकीट देण्यात आले असतानाही शिरोळे यांनी कोणतीही उघड नाराजी व्यक्त केली नव्हती.

भाजपच्या अंतर्गत चर्चेनुसार, 2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान बालवडकर यांनी अधिकृत उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घेतलेली भूमिका आणि त्यामुळे निर्माण झालेली नाराजीही सध्याच्या निर्णयामागील एक कारण मानलं जातंय.

या प्रकरणामुळे पुण्यातील स्थानिक राजकारणात पक्षनिष्ठा, बंडखोरी आणि उमेदवारीच्या निकषांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या निकाल प्रभाग 9 मधील या वादाचे राजकीय परिणाम स्पष्ट करेल. तसेच, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मुद्दा संघटनात्मक शिस्त आणि नेतृत्व व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे असंही राजकीय विश्लेषक सांगतात.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *