Tue. Jan 27th, 2026

पुणे महापालिका निवडणुकांपूर्वी मतदार यादी, प्रभाग रचना व यंत्रणांवर गंभीर आरोप

पुणे | द पॉलिटिक्स विशेष

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना पुणे महानगरपालिकेच्या (PMC) आगामी निवडणुकांपूर्वीच मोठा वाद उफाळून आला आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होताच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रशासन, राज्य निवडणूक आयोग आणि सत्ताधारी यंत्रणांवर गंभीर आरोप करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत लाखोंच्या संख्येने दुबार (डुप्लिकेट) व बोगस मतदार, तसेच एका प्रभागातील मतदारांचे नाव थेट दुसऱ्या, असंबंधित प्रभागात टाकल्याचा प्रकार समोर आल्याचा आरोप त्यांनी केला.

“मोबाईलमध्ये नंबर मर्ज होतात, मतदार का नाही?”


त्यांच्या मते, डुप्लिकेट मतदार न मर्ज करणे ही पुणेकरांची सरळसरळ फसवणूक आहे.

“प्रभागात नसलेले मतदार घातले जातायत – हा ठरवून केलेला गेम”

जगताप यांनी त्यांच्या वानवडी प्रभागाचे उदाहरण देत सांगितले की,

वानवडीतील मतदारांची नावे थेट स्वारगेट किंवा मुंडव्यासारख्या दूरच्या प्रभागात टाकली गेली

त्यामुळे मतदारांचा त्या प्रभागाशी कोणताही भावनिक किंवा विकासात्मक संबंध राहत नाही

परिणामी मतदान कमी होते आणि ठराविक उमेदवारांना फायदा होईल अशा पद्धतीने यादी तयार केली जाते

“हा अपघात नाही, ही सोची-समजून केलेली मॅन्युप्युलेशन आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला.

भाजपचे काही कार्यकर्तेही नाराज, पण “मोठे नेते गप्प”

प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले की,

भाजपमधील माजी नगरसेवक व दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील इच्छुक नाराज आहेत

मात्र मोठे नेते, स्टॉलवर्ट्स शांत आहेत

“हे देखील चित्र रंगवण्यासाठीच केलेलं नियोजित आंदोलन असण्याची शक्यता आहे,” असा संशय त्यांनी व्यक्त केला

“आचारसंहिता लागते तेव्हाच मतदार यादी ‘फ्रीझ’ व्हायला हवी”

मतदार यादीतील गोंधळाबाबत त्यांनी निवडणूक प्रक्रियेत मूलभूत सुधारणा सुचवली:

ज्या दिवशी आचारसंहिता लागू होते

त्या दिवशीच मतदार यादी अंतिम (फ्रीझ) व्हावी

निवडणूक होईपर्यंत एकही नाव वाढवता किंवा काढता येऊ नये

“आचारसंहिता लागू झाल्यानंतरही याद्या बदलतात. हे सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठीच केलं जातं,” असा आरोप त्यांनी केला.

“प्रभाग रचना म्हणजे पुणेकरांची थट्टा”

पुण्यातील प्रभाग रचना ही अनैसर्गिक, अवाढव्य आणि विकासासाठी अशक्य असल्याचे सांगत जगताप यांनी अनेक उदाहरणे दिली:

काही प्रभागांचा परीघ 28 ते 30 किमी

एका प्रभागात झोपडपट्टीपासून आलिशान सोसायटीपर्यंत क्षेत्र

बाणेरसारख्या प्रभागात 1.6 लाखांहून अधिक मतदार

“चार नगरसेवकांचा एवढा प्रचंड मतदारसंघ म्हणजे नागरिक व लोकप्रतिनिधी दोघांची थट्टा आहे,” असे ते म्हणाले.

सिंगल वॉर्ड सिस्टिमचा पुरस्कार

प्रशांत जगताप यांनी ठामपणे सांगितले की,

सिंगल वॉर्ड सिस्टिममध्ये जबाबदारी ठरते

चांगलं किंवा वाईट काम – सर्व श्रेय किंवा दोष एका नगरसेवकावर जातो

मल्टी-मेंबर प्रभाग हे जात-धर्माचे ध्रुवीकरण करण्यासाठी वापरले जातात

“ही लढाई फक्त निवडणूक नाही, लोकशाही वाचवण्याची आहे”

आपल्या भाषणाच्या शेवटी प्रशांत जगताप यांनी अत्यंत कठोर इशारा दिला:

288 विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी

उत्पन्न व मालमत्तेतील विसंगती उघड करण्याची मोहीम

भ्रष्ट अधिकाऱ्यांवर अँटी करप्शन कारवाईचा आग्रह

“ज्यांनी लोकशाही विकली आहे, त्यांना आम्ही सोडणार नाही,” असा थेट इशारा त्यांनी दिला.

पुणे निवडणुकीतील राजकीय संकेत

राष्ट्रवादी (शरद पवार गट) महाविकास आघाडीमध्येच लढणार

अजित पवार गट किंवा महायुतीसोबत कोणतीही आघाडी नाकारली

“विचारधारा महत्त्वाची, संख्येचा मोह नाही,” अशी भूमिका

पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी, प्रभाग रचना आणि प्रशासकीय यंत्रणांवर इतक्या तीव्र शब्दांत आरोप होणे, हे येत्या काळातील निवडणुका केवळ राजकीय नाही तर संस्थात्मक विश्वासाचीही कसोटी ठरणार असल्याचे संकेत देत आहे.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *