Tue. Jan 27th, 2026

राष्ट्रवादीच्या समीर चांदेरेंनी मतदारांना पैसे वाटल्याचा व्हिडीओ व्हायरल

पुणे | 3 जानेवारी 2026

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मध्ये मतदारांना पैसे वाटप केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाशी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांचा संबंध असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर भाजपने चांदेरे यांच्यावर थेट आरोप करत निवडणूक काळात त्यांना तडीपार करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे पुणे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.

भाजपचे प्रभाग क्रमांक ९ चे उमेदवार गणेश कळमकर, लहू बालवडकर, रोहिणी चिमटे आणि मयुरी कोकाटे यांनी असा आरोप केला आहे की, “प्रभागातील काही भागांत एका महिलेमार्फत मतदारांची नावे नोंदवून रोख रक्कम वाटप करण्यात येत होती आणि या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.”

भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार, व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित महिला मतदारांची नावे आणि पैशांबाबत बोलताना दिसत असून, हा व्हिडिओ खरा असल्यास तो निवडणूक आचारसंहितेचा गंभीर भंग ठरतो. या प्रकरणामुळे सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत..

भाजपकडून या प्रकरणात आक्रमक भूमिका घेण्यात येत असून, “पैशांच्या जोरावर मत विकत घेण्याचा हा प्रकार लोकशाहीसाठी घातक आहे. सत्ताधाऱ्यांच्या जवळचा व्यक्ती असल्यामुळे प्रशासनाकडून डोळेझाक होत आहे,” असा आरोप करण्यात आला आहे.

समीर चांदेरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे शहर युवक अध्यक्ष असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बाबुराव चांदेरे यांचे ते पुत्र आहेत. यापूर्वीही समीर चांदेरे यांच्यावर विविध वादग्रस्त आरोप झालेले असून, त्यामुळे हा नवा वाद राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.

या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत भाजप उमेदवारांनी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. या प्रकरणी व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासून दोषींवर कारवाई होते का? तसेच प्रशासन आणि निवडणूक आयोगाची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *