पुणे| 10 जानेवारी
कमला नेहरू हॉस्पिटल पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले हे रुग्णालय आज फक्त एक महानगरपालिकेचे रुग्णालय न राहता सर्वसामान्य नागरिकांसाठी हक्काचे, विश्वासार्ह आणि परवडणारे मल्टिस्पेशालिटी आरोग्यकेंद्र बनल्याचं दिसतंय. या सगळ्या परिवर्तनामागे पुणे महापालिकेचे माजी सभागृहनेते गणेश बिडकर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा, दूरदृष्टी आणि कमला नेहरु रुग्णालयाशी असलेली भावनिक नाळ ही फार महत्त्वाची ठरली आहे असं बोललं जातंय.
कमला नेहरू हॉस्पिटल हे एकेकाळी फक्त प्रसूतिगृह आणि काही मर्यादित ओपीडीपुरतेच सीमित होते मात्र आज ते अत्याधुनिक सुविधा असलेले मल्टिस्पेशालिटी रुग्णालय म्हणून ओळखले जात असल्याचे आपण पाहतोय. कमला नेहरु हॉस्पिटलमध्ये अनेक आरोग्यसुविधा अल्पदरात किंवा अनेकदा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत जसे की, एमआरआय, एक्स-रे, सीटी स्कॅन, रक्ततपासणी, कॅथलॅब, अँजिओग्राफी – अँजिओप्लास्टी, हृदयशस्त्रक्रिया, डायलिसिस, एनआयसीयू, सांधेरोग उपचार अशा आरोग्यसुविधा. विशेष म्हणजे ‘कै. मधुकर सखाराम बिडकर रक्तपेढी’ ही पुणे महानगरपालिकेची पहिली २४ तास कार्यरत अशी रक्तपेढी च हॉस्पिटलमध्ये सुरू झाली आहे.
गणेश बिडकर हे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना या रुग्णालयासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला असंही सांगितलं जातं. त्यातून स्वच्छता व्यवस्था, सीसीटीव्ही सुरक्षा, अत्याधुनिक यंत्रसामग्री, इमारतीचे आधुनिकीकरण आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उभी राहिल्याचं बोललं जातं. याचा थेट फायदा गोरगरीब, शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना झाल्याचं दिसून येतं. आज कमला नेहरु रुग्णालयात महिन्याला सरासरी ५५० प्रसूती होत असून वर्षाला हजारो गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडतात. याच कमला नेहरू हॉस्पिटलने कोरोना काळात लसीकरणात आघाडी घेत ८५ हजारांहून अधिक नागरिकांचे सुरक्षित लसीकरण केल्याचंही दिसतं. अनेक गरजू नागरिकांना ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ या उपक्रमाच्या माध्यमातून मोफत एमआरआय, शस्त्रक्रिया, उपचार, लसीकरण आणि सरकारी योजनांचा लाभ मिळाल्याचं सांगण्यात येतं.
यामुळेच गणेश बिडकर हे केवळ लोकप्रतिनिधीच नाहीत तर संकटात धावून येणारे आरोग्यदूत आहेत अशी प्रतिमा नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. कमला नेहरू हॉस्पिटलचा झालेला हा कायापालट आणि सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी उभे राहिलेले भक्कम जाळे पाहता गणेश बिडकर यांचे कार्य हे केवळ राजकीय नव्हे तर समाजाभिमुख आणि मानवी भावनांशी, संवेदनांशी जोडले असल्याचं प्रभागातील नागरिक सांगतात.

