Sat. Mar 28th, 2026

ढाका | 13 फेब्रुवारी 2026

बांगलादेशच्या लोकशाही प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा 12 फेब्रुवारी रोजी पार पडला आहे. ऑगस्ट २०२४ मधील GEN Z च्या क्रांतीनंतर झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने (BNP) दोन-तृतीयांश बहुमत मिळवून दणदणीत विजय संपादन केला आहे. या विजयामुळे गेल्या दोन दशकांपासून सत्तेबाहेर असलेल्या BNP चा सत्तेत परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

निवडणुकीचे निकाल आणि पुढील पंतप्रधान

ताज्या आकडेवारीनुसार, ३०० सदस्यीय संसदेत सरकार स्थापनेसाठी १५१ जागांची आवश्यकता असताना BNP ने २०० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला आहे. या विजयानंतर पक्षाचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान खलिदा झिया यांचे सुपुत्र तारिक रहमान हे बांगलादेशचे पुढचे पंतप्रधान होण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत. १७ वर्षांच्या वनवासानंतर देशात परतलेल्या ६० वर्षीय रहमान यांनी स्वतः ढाका-१७ आणि बोग्रा-६ या दोन्ही मतदारसंघातून  दणदणीत विजय मिळवला आहे.

या निवडणुकीत ‘बांगलादेश जमात-ए-इस्लामी’ पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला असून तो मुख्य विरोधी पक्ष म्हणून समोर आला आहे. शेख हसीना यांच्या अवामी लीगला निवडणुकीत सहभागी होण्यापासून रोखण्यात आले होते, ज्यामुळे राजकीय पटलावर BNP आणि जमात यांच्यातच मुख्य लढत पाहायला मिळाली.

BNP च्या मोठ्या विजयाची कारणे

१. पर्यायाचा अभाव: शेख हसीना यांच्या अवामी लीगवर बंदी असल्याने, मतदारांसमोर BNP हाच सर्वात मोठा आणि जुना राजकीय पर्याय उपलब्ध होता.

२. युवा मतदारांचा पाठिंबा: ५० लाख प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांसह एकूण १२ कोटी ७७ लाख पेक्षा जास्त मतदारांनी या निवडणुकीत सहभाग घेतला होता. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, रोजगार निर्मिती आणि आर्थिक स्थैर्य या आश्वासनांनी तरुणांना आकर्षित केले.

३. Referendum (जनमत चाचणी): निवडणुकीसोबतच संविधानिक सुधारणांवर घेण्यात आलेल्या सार्वत्रिक जनमत चाचणीत ६५.३% लोकांनी ‘हो’ च्या बाजूने कौल दिला, ज्याचा फायदा BNP ला झाला.

४. भ्रष्टाचार विरोधी मोहीम: १७ वर्षांच्या हद्दपारीनंतर परतलेल्या तारिक रहमान यांनी ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाद्वारे भ्रष्टाचार निर्मूलनाचे आश्वासन दिले आहे.

भारत-बांगलादेश संबंधांवर परिणाम

शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर आणि त्यांनी भारतात आश्रय घेतल्यानंतर भारत-बांगलादेश संबंध प्रचंड ताणलेले आहेत. तरीही बांगलादेशातील निवडणुकांचे निकाल स्पष्ट होताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी BNP च्या तारिक रहमान यांचे अभिनंदन केले असून लोकशाही आणि सर्वसमावेशक बांगलादेशला पाठिंबा दर्शवला आहे. BNP अनेक नेत्यांनी देखील भारतासोबत संबंध सुधारण्याची भाषा केली आहे. तथापि तीस्ता जलवाटप करार, बांगलादेशातील हिंदूंची सुरक्षा आणि कट्टरपंथीय गटांवर कारवाई यासारखे मुद्दे भारत-बांगलादेश संबंधांची दिशा ठरवणारे असतील.    

हिंदू अल्पसंख्याकांची स्थिती आणि भविष्य

निवडणुकीपूर्वी बांगलादेशात हिंदू समुदायावर झालेल्या हल्ल्यांमुळे भारताने वारंवार चिंता व्यक्त केली होती. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर काही सकारात्मक चिन्हे दिसत आहेत:

BNP चे ज्येष्ठ हिंदू नेते गयाेश्वर चंद्र रॉय यांनी ढाका-३ या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांचा विजय हा प्रतिकूल परिस्थितीतही अल्पसंख्याक समाजाचा राजकीय सहभाग अधोरेखित करतो.

तारिक रहमान यांनी ‘प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करू’ असे आश्वासन दिले आहे.

निवडणुकीच्या वेळी १ दशलक्ष सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते, ज्यामुळे ही निवडणूक मोठ्या प्रमाणावर हिंसाचारमुक्त पार पडली.

असे असले तरी, कट्टरपंथी गटांचा वाढता प्रभाव आणि मागील काही महिन्यांतील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर नवीन सरकार अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी किती ठोस पावले उचलते, याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष असेल.

बांगलादेशात आता एका नवीन युगाची सुरुवात होत असून, तारिक रहमान यांच्यासमोर देशाची विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था सुधारणे आणि प्रादेशिक स्थिरता राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.  

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *