बाणेर | डिसेंबर 2025
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ९ मध्ये भाजपने लहू बालवडकर यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या प्रभागात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या अमोल बालवडकर यांना तिकीट नाकारण्यात आले. या निर्णयामागे पक्षातील शिस्त, संयम आणि पक्षनिष्ठेला प्राधान्य देण्याची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान अमोल बालवडकर यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अधिकृत उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. स्वतःला तिकीट मिळावे यासाठी त्यांनी पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचीही चर्चा त्या काळात झाली होती. याच पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा राजकारणात संयम हा सर्वात मोठा सद्गुण आहे असे विधान केले आहे. मात्र अमोल बालवडकर यांनी अपेक्षित संयम न दाखवता पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे, यावेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

या पार्श्वभूमीवर भाजपने लहू बालवडकर यांना संधी दिली असून, हा निर्णय पक्षनिष्ठा आणि सातत्यपूर्ण कामगिरीला दिलेले बक्षीस असल्याचे मानले जात आहे. लहू बालवडकर हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागात सक्रिय असून स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सातत्यपूर्ण सहभाग राहिला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तसेच स्थानिक नागरिकांमध्ये त्यांची चांगली ओळख आहे. पुणे महानगरपालिके नव्याने समाविष्ट झालेली काही गावे प्रभाग क्र. ९ मध्ये येतात. या गावांचे राजकारण प्रामुख्याने गावकी आणि भावकीभोवती फिरते. या सामाजिक रचनेत लहू बालवडकर यांची पकड मजबूत असल्याचे बोलले जाते. भावकीच्या राजकारणात त्यांना मिळणारा पाठिंबा हा निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो असेही राजकीय विश्लेषकांचे मत आहे. तसेच या प्रभागात उच्चभ्रू सोसाट्याही मोठ्या प्रमाणावर आहेत. या भागात भाजपच्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे. यामुळेच या निवडणुकीत लहू बालवडकर यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
एकूणच, पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने घेतलेला हा निर्णय केवळ उमेदवारीपुरता मर्यादित नसून, पक्षशिस्त, संयम आणि निष्ठा या मूल्यांना दिलेले महत्त्व अधोरेखित करणारा असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

