वडगावशेरी | डिसेंबर २०२५
पुणे महापालिकेसाठी उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी वडगावशेरी मतदारसंघात राजकीय समीकरणांना कलाटणी देणारा ट्विस्ट पाहायला मिळाला. भाजपकडून सुरेंद्र पठारे यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नी सौ. ऐश्वर्या पठारे यांना प्रभाग क्रमांक ३ मधून उमेदवारी देण्यात आली असून सुरेंद्र पठारे हे त्यांच्या पारंपरिक वॉर्ड क्रमांक ४ मधून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोहगाव–विमाननगर या प्रभागात उच्चशिक्षित आयटी वर्गासोबतच गावकी–भावकीचे पारंपरिक राजकारण प्रभावी आहे. सुरेंद्र पठारे यांची या परिसरात मजबूत पकड आणि मोठा जनाधार असला, तरी प्रभागातील सामाजिक संतुलन आणि स्थानिक राजकीय समीकरणांमुळे पुरुष उमेदवाराऐवजी महिलेला संधी द्यावी लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन सुरेंद्र पठारे यांनी स्वतः प्रभाग क्रमांक ४ मधूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, तर प्रभाग क्रमांक ३ मधून सौ. ऐश्वर्या पठारे यांना रिंगणात उतरवण्यात आले.
या निर्णयामुळे प्रभाग क्रमांक ३ मधील भाजपचे पॅनल अधिक बळकट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सौ. ऐश्वर्या पठारे या एमआयटीमधून इंजिनिअर असून त्यांनी भारतासह परदेशातील नामांकित आयटी कंपन्यांमध्ये काम केलेले आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या आयटी आणि सोसायटी वर्गाशी त्यांचा थेट संपर्क असून, स्वतः आयटी क्षेत्रातील अनुभव असल्यामुळे स्थानिक नागरी समस्या समजून घेण्याची त्यांची क्षमता ही त्यांची जमेची बाजू मानली जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या माध्यमातून त्या या भागात सामाजिक कार्य करत असून, अलीकडील काळात ‘सखी प्रेरणा मंच’च्या माध्यमातून त्यांनी ७ हजारांहून अधिक महिलांचे संघटन उभे केले आहे. याशिवाय आमदार बापूसाहेब पठारे आणि सुरेंद्र पठारे यांच्या निवडणुकांमध्ये बॅकएंड व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी प्रभावीपणे पार पाडल्याचा अनुभवही त्यांच्या पाठीशी आहे.

उच्चशिक्षित महिला उमेदवाराला संधी देत भाजपने प्रभाग क्रमांक ३ आणि ४ दोन्ही प्रभाग सुरक्षित करण्याच्या दृष्टीने रणनीतिक पाऊल उचलल्याचे चित्र सध्या वडगावशेरीत दिसून येत आहे.

