बारामती | 28 जानेवारी 2026
“जोपर्यंत माझे हात पाय हालतायत तोपर्यंत तुमचं भलंच करीन बाकी काही करणार नाही. मी कामाचा माणूस आहे.” असं म्हणून दादा गेले, कामाचा माणूस गेला, लाडक्या बहिणींचा भाऊ गेला. 28 जानेवारी 2026 ची सकाळ महाराष्ट्रासाठी काळा दिवस घेऊन आली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. नियतीही क्रूर असते ना 20 जुलै 1959ला ज्या मातीत जन्म घेतला जिथून राजकीय कारकिर्द घडली जिथून महाराष्ट्राच्या राजकारणात ते पूर्णपणे सक्रिय झाले. त्याच मातीत म्हणजे बारामतीत आज दादा शेवटचं विसावले. अन् एका प्रशासकीय युगाचा अंत झाला आणि अजित पवारांच्या रुपात महाराष्ट्राने खरोखरच एक ‘कामाचा माणूस’ गमावला. खरंतर सूर्यसुद्धा सकाळी 6 वाजता उगवत असेल पण अजित दादा हे त्याआधीच म्हणजे 5 ला उठून कामाला लागायचे.
अजितदादांनी 1982 मध्ये सहकार क्षेत्रातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यांच्या राजकारणाची पाळंमुळं ही बारामतीच्या मातीत आणि शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली रुजली असली तरी, त्यांनी स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. ‘सकाळी ७ वाजता मंत्रालयात हजर होणारा मंत्री’ आणि ‘कमी वेळात कामाच्या फायली निपटवणारा नेता’ अशी त्यांची प्रतिमा संपूर्ण प्रशासनात आणि जनमानसात तयार झालेली. तुझं काम होणार म्हणजे होणार हा शब्दंय दादाचा लक्षात ठेवायचं. हे दादांचं वाक्य आणि त्यांचा हाच बाणा त्यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळं ठरवतो.
अजित पवारांच्या राजकीय कार्यकीर्दीचा विचार केला तर ते सहकार क्षेत्रातून राजकारणात आले. 1982 मध्ये सहकारी साखर कराखान्याच्या संचालक मंडळावर ते निवडून आले आणि तिथून राजकीय प्रवास सुरू झाला. पुढे त्यांनी 1991 साली बारामती विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि विजय मिळवून विधानसभेत प्रवेश केला. तेव्हापासून बारामती हा त्यांचा अभेद्य बालेकिल्ला ठरला.
अनेक मंत्री पदं भूषवली, सहावेळा उपमुख्यमंत्री या पदांवर राहून बारामतीत स्वतःचा वेळ आणि लक्ष सतत दिलं. इतर नेते जसं निवडणूक संपली की मतदारसंघात दिसत नाहीत, तसं काही दादांच्या बाबतीत दिसले नाही. त्यांनी बारामतीसाठी नेहमीच एक स्वतंत्र व्हिजन ठेवले चांगल्या रस्त्यांचं जाळं, दर्जेदार पाणीपुरवठा, औद्योगिक वसाहती, शिक्षणसंस्था, आरोग्यसेवा, शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान अशा सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित केले होते. केवळ सत्तेची हाव किंवा राजकीय डावपेच नाही तर बारामतीसारख्या मतदारसंघासाठी त्यांनी केलेली निष्ठावान कामगिरी हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीचे कायमच मोठे भांडवल ठरले आहे.
बारामती सोबतच आजचे आधुनिक पिंपरी-चिंचवड हे सुद्धा अजितदादांच्या दूरदृष्टीचे प्रतीक मानले जातं. जेएनयूआरएम (JNURM) अंतर्गत त्यांनी शहरासाठी दोन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी आणला आणि रस्ते, उड्डाणपूल, पाणीपुरवठा व कचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प मार्गी लावले. महाराष्ट्रातील धरणांची विकास कामे आणि सिंचन प्रकल्पांमध्ये त्यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. कृषीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि विविध साखर कारखान्यांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थकारणावर आपली मजबूत पकड निर्माण केली होती.
अजितदादांच्या कामाची पद्धत ही कोणत्याही कॉर्पोरेट सीईओपेक्षा कधीच कमी नव्हती ती कायमच शिस्तबद्ध होती. वेळेबाबत ते अत्यंत काटेकोर होते. पहाटे कामाला सुरुवात करून आपल्यासोबतच सगळ्याच अधिकाऱ्यांना कामाला लावणं हा त्यांचा हातखंडा होता. पण असं असतानाही प्रत्येक काम वेळेवर करणाऱ्या दादांनी स्वत: मात्र चुकीच्या वेळी एक्झिट घेतली.
विकासकामं करताना ती पुढच्या 50 वर्षांचा विचार करून आणि दर्जेदारच असली पाहिजेत, असा त्यांचा आग्रह असायचा. मंत्रालयातील सनदी अधिकाऱ्यांपासून ते ग्रामीण भागातील तलाठ्यापर्यंत आणि अगदी पत्रकारांच्या मनातही दादांच्या बाबत एक आदरयुक्त भिती आणि एक दरारा होता. त्यांच्या दरबारात फाईल कधीच अडकून पडत नव्हती त्यांच्याकडे पोहचलेल्या फाईलवर, कामावर, निर्णयावर शिक्कामोर्तब होतोच असं कामय लोकांना वाटायचं आणि याची साक्ष अजित दादा गेल्यानंतरही माळरानावर फडफडणारे हे कागद देतायत. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी केवळ आपल्या कामांचाच ध्यास घेतला होता हेच यातून दिसतं.
राजकारणात त्यांना दादा ही पदवी जनतेने आणि कार्यकर्त्यांनी बहाल केलेली. त्यांच्या जनता दरबारामध्ये सामान्य माणसाच्या समस्या थेट ऐकून घेतल्या जायच्या. शेतकरी असो वा सामान्य कार्यकर्ता दादांकडे गेल्यावर काम होणारच हा विश्वास त्यांनी कमावला होता…लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून त्यांनी महिलावर्गातही लाडका भाऊ ही प्रतिमा तयार केली होती.
आज अजित पवार आपल्यात नाहीत, ही वस्तुस्थिती स्वीकारणं महाराष्ट्रासाठी कठीण आहे. ज्या बारामतीतून त्यांचं नेतृत्व बहरलं, त्याच बारामतीच्या मातीत त्यांच्या प्रवासाचा शेवट व्हावा हे आज कोणालाच पचनी पडत नाहीये.
पण एक मात्र नक्की की, महाराष्ट्राने केवळ एक राजकारणी गमावला नाहीये, तर एक कामाचा माणूस गमावला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ‘गॉडफादर’ अनेक असतील, पण ‘कामाचा माणूस’ म्हणून अजितदादांनी जी पोकळी निर्माण केली आहे, ती भरून काढणे येणाऱ्या काळात तरी कठीण आहे.

